पंतप्रधान मोदींनी नागरिकांना मन की बातमधून दिला ‘संयमा’चा आणि स्वदेशी बाजारमंत्र

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २६ ऑक्टो – नवीदिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेला संबोधित केलं. कोरोना संक्रमणाच्या काळातल्या या सणासुदीच्या दिवसांत लोकांनी संयम बाळगावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिला आहे. देशातील नागरिकांना पंतप्रधानांनी दस-याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

‘दस-याच्या सणानिमित्तानं दरवर्षी मोठ-मोठ्या जत्रा भरतात. परंतु, यंदा मात्र त्यांचं स्वरुप वेगळं आहे. रामलीलाचा उत्सवही मोठं आकर्षण असंत, परंतु, यंदा त्यावरही अनेक निर्बंध आहेत. नवरात्रीत गुजरातच्या गरब्याचा आवाज सर्वत्र दिसत असे, यंदा मोठमोठे सर्व आयोजन बंद आहेत. दस-याचा हा सण असत्यावर सत्याचा विजय आहे. परंतु, एकातऱ्हेनं हा दिवस संकटावर धैर्याचा विजयाचाही सण आहे’ असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं.

कोरोनाच्या या संकटकाळात आपल्याला संयम बाळगायचा आहे, मर्यादेत राहायचं आहे. यापुढे आणखीही अनेक सण येत आहेत. अजून ईद आहे, शरद पौर्णिमा, वाल्मिकी जयंती, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा, गुरूनानक देव जयंती हे सण येत आहेत. सण म्हटलं आपण अगोदर तयारीची सुरूवात करतो. त्यात मनात पहिला प्रश्न येतो की बाजारात कधी जायचं? काय काय खरेदी करायचं? खासकरून मुलांना नवीन काय मिळणार? याची उत्सुकता लागून राहिलेली असते. सण आणि बाजार एकमेकांशी जोडलेले आहेत. यंदा खरेदी करताना तुम्हाला व्होकल फॉर लोकलचा संकल्प ध्यानात ठेवायचा आहे. बाजारातून खरेदी करताना आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे’ असं म्हणत त्यांनी नागरिकांना स्वदेशी बाजारमंत्रही दिला आहे.

यावेळी, पंतप्रधानांनी देशाच्या सैनिकांनाही विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यंदा दिवाळीत सीमेवर तैनात सैनिकांच्याही नावानं एक दिवा लावावा, असं आवाहनही पंतप्रधानांनी नागरिकांना केलंय. ‘आपल्याला त्या बहादूर सैनिकांनाही ध्यानात ठेवायचंय जे या सणांतही सीमेवर तैनात आहेत, भारत मातेची सेवा आणि सुरक्षा करत आहेत. त्यांची आठवण ठेवून आपल्याला सण साजरे करायचे आहेत. आपल्याला घरात एक दिवा, भारत मातेच्या या वीर मुला-मुलींच्या सन्मानासाठीही तेवत ठेवायचा आहे. मी वीर जवानांनाही सांगू इच्छितो की तुम्ही सीमेवर असाल तरी संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी कामना करत आहोत. मी त्या कुटुंबीयांच्या त्यागालाही नमन करतो, ज्यांचे मुलं-मुली आज सीमेवर शहीद झाले आहेत’ असं म्हणत पंतप्रधानांनी देशवासियांच्या काळजालाही हात घातला.

यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला. ३१ ऑक्टोबर रोजी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपण गमावलं. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो, असंही मोदींनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *