एकदा होऊन जाऊ द्या … नीलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २६ ऑक्टो – मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घणाघाती भाषणाचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना माजी खासदार नीलेश राणे यांनी थेट आव्हानाची भाषा केली आहे.


प्रतिवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या वाटचालीत वेगळं स्थान आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानाऐवजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्यानं शिवसैनिकांमध्ये याबद्दल विशेष उत्सुकता होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही काळात राजकीय भाष्य करणं टाळलं होतं. मात्र इतर पक्षांकडून राजकारण सुरू होतं. शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर टीका सुरू होती. या साऱ्याला मुख्यमंत्रिपदाचं मास्क काढून उत्तर देणार असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार काल त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेवर सातत्यानं टीका करणारे नारायण राणे व त्यांचे दोन चिरंजीव आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनाही उद्धव यांनी लक्ष्य केले.

नारायण राणेंना उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता बेडकाची उपमा दिली. ‘गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करताहेत. बेडकीने बैल पाहिला ही गोष्ट आपण ऐकली असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाजच येईना. तो आता चिरका झालाय,’ असा चिमटा ठाकरे यांनी काढला होता.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला नीलेश व नीतेश यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा…,’ असं आव्हानच नीलेश राणे यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *