महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ ऑक्टोबर – नवी दिल्ली : सरकारद्वारे देशांतर्गत विमान सेवांच्या तिकिटांचे किमान आणि कमाल दर काही महिन्यांच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, २४ नोव्हेंबरनंतरही फेब्रुवारी महिन्यापर्यंत ते दर कायम राहणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली.
सरकारनं २१ मे रोजी देशांतर्गत विमानांच्या तिकिटांसाठी कमाल आणि किमान दर निश्चित केले होते. सर्वप्रथम २४ ऑगस्टपर्यंत ते दर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर त्या कालमर्यादेत वाढ करून २४ नोव्हेंबरपर्यंत कमाल आणि किमान दर निश्चित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘या महिन्याच्या अखेरपर्यंत देशांतर्गत विमानसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर निश्चित करण्यात आलेले तिकिटांचे किमान आणि कमाल दर हटवण्यास कोणतीही अडचण नसेल,’ असंही हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. त्यावेळी देशातील विमानसेवाही बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच २५ मे रोजी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. २१ मे रोजी डीजीसीएनं तिकिटांच्या दरासाठी कमाल आणि किमान दर निश्चित करत सात बँडची घोषणा केली होती.