विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे : संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ नोव्हेंबर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून आम्ही कायम त्यांचा सन्मान केला. ते तरुण आहेत, त्यांचा अनुभव वाढत जाणार आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. ध्यानीमनी नसताना ते मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
“उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये चांगला संवाद आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये चांगला संवाद असायला हवा. पण अनेकदा ही श्रृंखला तुटताना दिसत आहे. विरोधी पक्षाने आपलं महत्व ओळखायला हवं. आम्ही १०५ असून समांतर सरकार चालवत आहोत असा विचार त्यांनी केला पाहिजे. सत्ता गेली म्हणून राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *