भारताशी संबंध आणखी दृढ करणार ; ज्यो बायडन

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ नोव्हेंबर – अमेरिकेचे भावी अध्यक्ष जोसेफ तथा ज्यो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मंगळवारी दूरध्वनीवरून प्रदीर्घ चर्चा केली आहे. भारताशी संबंध आणखी दृढ करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. भारत-प्रशांतीय क्षेत्रात शांतता आणि समृद्धी आणण्यासाठी भारताला सोबत घेऊन कार्य करण्याचे अभिवचन त्यांनी दिले. हा चीनला अप्रत्यक्ष इशारा मानण्यात येत आहे.

तसेच जगाची अर्थव्यवस्था गतिमान करणे, जागतिक कोरोना संसर्गाचे प्रथम नियंत्रण आणि नंतर उन्मूलन करणे व पर्यावरण संरक्षणासाठी पावले उचलणे यासंदर्भात भारताचे सहकार्य अमेरिकेसाठी मोलाचे आहे. त्यामुळे भारताशी हातात हात घालून वाटचाल करण्याचे अमेरिकेचे धोरण असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अभिनंदनाच्या संदेशाला उत्तर

बायडन अमेरिकेचे अध्यक्ष होणार ही बाब स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे तसेच त्यांच्या सहकारी व भावी उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करणारे पत्र पाठविले होते. या अभिनंदन संदेशाला उत्तर म्हणून बायडन यांनी मोदींशी दूरध्वनीवर संवाद साधला होता. दोन्ही नेत्यांनी विविध द्विपक्षीय व जागतिक विषयांवर यावेळी चर्चा केली.

पत्रक प्रसिद्ध

बायडन यांच्या संघाकडून दोन्ही नेत्यांमधील चर्चेसंबंधी, तसेच बायडन यांच्या भारतविषयक धोरणाविषयी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात दोन्ही नेत्यांच्या दूरध्वनी चर्चेचा सविस्तर उल्लेख आहे. अभिनंदनपर संदेशासाठी बायडन यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच अमेरिका-भारत संबंधांचा आलेख अधिकाधिक उंच करण्याची व सहकार्य विस्तृत करण्याची इच्छा प्रकट केली.

पंतप्रधान मोदींनी बायडन यांच्यासमवेत भावी उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले होते. हॅरिस या त्यांच्या मातेकडून भारतीय वंशाच्या आहेत. त्या अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या प्रथमच उपाध्यक्षा आहेत. त्यांचे यश हे अमेरिकेतील उद्योगी भारतीय समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मोदींनी आपल्या संदेशात काढले होते. याचाही उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे.

मोदींचा ट्विटर संदेश

बायडन यांच्याशी दूरध्वनी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही ट्विटर संदेशाद्वारे या चर्चेची माहिती देशवासियांना दिली. भावी अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्याशी आपली आश्वासक आणि सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मोदींनी संदेशात म्हटले आहे.

भारताशी संबंधांचे समर्थक…

बायडन हे सुदृढ अमेरिका-भारत संबंधांचे प्रारंभापासूनच समर्थक राहिले आहेत. ते अमेरिकेच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधीगृहाचे सदस्य असताना त्यांनी भारत-अमेरिका संबंधांचा पक्ष उचलून धरला होता. 2008 मध्ये भारत आणि अमेरिकेत झालेल्या ऐतिहासिक अणुकरारात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यांनी काही स्वपक्षीय नेत्यांचा विरोध पत्करून या कराराची पाठराखण केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *