गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार सोहळा 2020 चे आयोजन

Spread the love

महाराष्ट्र 24 । बीड । विशेष प्रतिनिधी ।

गेवराई शहरातील कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनिय योगदान देणार्या ज्येष्ठ कलावंत व साहित्यिक मान्यवरांचा गेवराईकरांच्यावतीने गेवराई भूषण जीवन गौरव पुरस्कार सोहळा 2020चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता, तथास्तु मंगल कार्यालय, ताकडगाव रोड, गेवराई जि. बीड या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी महाराष्ट्र 24 ला दिली.

वयाची ७५ वर्ष पूर्ण होत असलेल्या दिग्गज जेष्ठ नाट्य कलावंतांचा गेवराई भूषण जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम येथील कलाकारांनी घडवून आणला आहे. त्यांच्या नाट्य कार्यकर्तृत्वाचा इतिहास नवोदित कलावंतासमोर मांडून प्रेरणा देण्यासाठी हा सोहळा होत आहे. यामध्ये शाहीर रामभाऊ मुळे ( नाट्य -संगीत ), हभप उत्तमनाना मोटे, (अध्यात्म- संगीत ), विठ्ठलराव वादे ( लोककला -नाटय), प्राचार्य शिवाजीराव देवढे( साहित्य -संस्कार ) यांना जेष्ठ नाटककार अॅड. कमलाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. भव्य सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पहार, शाल, फेटा देऊन सपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे.

गेवराई शहरातील नाट्यपरंपरेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पूर्वी हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर व काळा मारोती मंदिर संस्थानच्या वतीने दरवर्षी हनुमान प्रासादिक तीन अंकी नाटकं व्हायची. त्या वेळच्या नाटय कलाकारांची ५ वी पिढी सध्या रंगमंचावर आहे. संगीतरत्न स्व. हमीद पटेल यांनी घडविलेल्या संगीत व नाटय कलाकारांचा वारसा सुरू आहे. शाळा -महाविद्यालयामधून एकांकिका, नाटकं होत असत. गेवराईने सिने -नाट्यसृष्टीला अनेक कलावंत दिले.१९७५ ते २००५ सालापर्यंत बाल कलाकारांना घेऊन  पंचगंगा,गीतांजली,अरुणोदय मेळे चालायचे. यानंतर टी.व्ही, मोबाईलचे आधुनिक युग आले. अपवादात्मक स्थितीत आजही तालुक्यातील काही गावांमध्ये यात्रा -उत्सव दरम्यान संगीत -नाटय कार्यक्रम होतात असे नाही.

गौरवमूर्तींना सन्मानित करण्यासाठी चित्रपट -नाटय क्षेत्रातील भूमिपूत्र शिव कदम ( डायरेक्टर, फिल्म मेकींग इन्स्टीट्यूट), संजय नवगिरे (टकाटक, रेडू) , राजकुमार तांगडे (तुकाराम चित्रपट), संभाजी तांगडे (सैराट), अभिनेते तथा राष्ट्रवादी चित्रपट, नाट्य, कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाचे विभागीय अध्यक्ष  डॉ. सुधीर निकम (चित्रपट-नाटय)आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सदर कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून, सॅनिटायझरचा वापर करून रसिकांची मर्यादित संख्या ठेवून फक्त निमंत्रितांसाठीच ठेवला आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिला कलावंत, जेष्ठ व नवोदित कलावंत यांच्या महिनाभराच्या मेहनतीतून पार पडणार आहे. विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे. संग्राह्य स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. घरी बसून रसिक प्रेक्षकांना हा अविस्मरणीय सोहळा पाहता यावा यासाठी अप्रुप ट्रस्टच्या फेसबुक पेजवरून कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने प्रेक्षक, नागरिकांनी घरी बसून आनंद घेता येणार आहे. तसेच याचा आस्वाद घ्यावा,असे आवाहन गौरव सोहळा समितीचे सदस्य अॅड. सुभाष निकम, प्रा. राजेंद्र बरकसे, प्रा. प्रमोद झेंडेकर, प्रकाश भुते, ज्ञानेश्वर मोटे, विष्णूप्रसाद खेत्रे, शाहीर विलासबापू सोनवणे, प्रशांत रुईकर, रंजित सराटे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *