कर्करोगाच्या जगभरातील संशोधनावर आता पुण्याचा ठसा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ नोव्हेंबर – ज्येष्ठ नागरिकांमधील कर्करोगाच्या जगभरातील संशोधनावर आता पुण्याचा ठसा उमटणार आहे. कारण, पुण्यातील वैद्य योगेश बेंडाळे यांची कॅनडाच्या ‘मल्टिनॅशनल असोसिएशन ऑफ सपोर्टिव्ह केअर इन कॅन्सर’च्या (एसएएससीसी) जेरियाट्रिक्‍स अभ्यास समूहाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. या पदावर निवड होणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

कर्करोगग्रस्तांच्या मदतीबरोबरच कर्करोगावर संशोधन आणि त्याच्या शिक्षणात ‘एमएएससीसी’ ही आंतरराष्ट्रीय बहुशाखीय संस्था कार्यरत आहे. जगातील सत्तरपेक्षा जास्त देश याचे सदस्य आहेत. जेरियाट्रिक अभ्यास समूह हा एमएएससीसीचा भाग असून त्यात ‘जेरियाट्रिक ऑन्कोलॉजी’चा समावेश आहे. त्यांच्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथींचा, पोटाचे तसेच, फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्‍यता असते. कर्करोगाच्या संशोधनासाठी निवडल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये वयस्क रुग्णांचा समावेश केला जात नाही.

या वयातील रुग्णांना मधुमेह, हृदयविकार असे अनेक आजार असतील तर त्यांच्या कर्करोगाची चिकित्सा अधिकच आव्हानात्मक होते. अशा रुग्णांमधील कर्करोगाच्या आव्हानांसाठी संशोधनपूर्व मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करणे हा या अभ्यासगटाचा मुख्य उद्देश आहे.

आघाडीचे संशोधक आणि तज्ज्ञ म्हणून ‘एमएएससीसी’मध्ये वैद्य योगेश बेंडाळे यांचे ज्ञान आणि अनुभव ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यात नवनव्या संशोधनात उपयुक्त ठरेल. आयुर्वेद आणि भारतीय पारंपरिक ज्ञानासंबंधी असलेल्या ध्येयातून वैद्य योगेश बेंडाळे यांनी रसायु ग्रुपची स्थापना केली असून त्यात कॅन्सर रुग्णांवर उपचार, स्त्री आरोग्य, गंभीर आजारावरील उपचार, औषध निर्मिती आणि संशोधन कार्य सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *