अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ नोव्हेंबर – डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. मात्र ट्रम्प आपला पराभव स्वीकारण्यास तयार नव्हते. पण अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जीएसएला म्हणजेच ‘जनरल सर्व्हिस ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ला सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी परवानगी दिली आहे. जे करण्याची गरज आहे ते करा असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी ज्यो बायडन यांना पत्र लिहिलं असून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटवरून जीएसए एमिली मर्फी यांचे आभार मानले असून त्यांना धमकावलं तसेच छळ केल्याचाही आरोप केला आहे. आपण त्यांच्यासोबत किंवा त्यांचे कुटुंबीय आणि जीएसच्या कर्मचा-यांसोबत असं होताना पाहू शकत नाही असंही ते म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव न स्वीकारणे हे लाजिरवाणे असल्याचे सांगून हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा नाही, असे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडन यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. डोनाल्ड ट्रम्प निकालांविरोधात त्यांनी न्यायालयातही धाव घेतली. तर, बहुमताचा स्पष्ट कौल बायडन यांना मिळालेला आहे. याबाबत बायडन यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, हे लाजिरवाणे आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या नावलौकीकास हे शोभा देणारे कृत्य नाही. बायडन यांनी ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष केले असून आमच्या योजनांसाठी महत्त्वाचे नाही, असे स्पष्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *