महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ डिसेंबर – रेल्वे स्थानकांवर यापुढे ‘पेपर कप’ऐवजी ‘कुल्हड’मधून चहा द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. पण मुंबईत अद्यापही अनेक रेल्वे स्थानकांवर पेपर कपमध्येच चहा मिळत आहे. तर काही रेल्वे स्थानकांत कुल्हडमध्ये चहा मिळतो, मात्र त्याला तुरळक प्रतिसाद आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देशातील सर्व रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. २००४ ते २००९ दरम्यान यूपीएच्या काळात लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवर कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती. मात्र, त्यांचे मंत्रिपद जाताच हा उपक्रम बंद पडला. पुन्हा पेपर कपमधून चहा देण्यात येऊ लागला.
कुल्हडमधून चहा देण्यात येणार असल्याने कंत्राटदाराला शहरातील कुंभार व्यावसायिकांकडून कुल्हड खरेदी करावे लागतील. मात्र आता कुल्हडचा तुटवडा आहे. कुल्हड महाग असल्याने विक्रेते जे ग्राहक कुल्हडची मागणी करतील त्यांनाच ते देत आहेत. कुल्हड वापरून फेकून दिले जातात. सध्या एक कुल्हड ५ रुपयांना मिळतो. यामुळे चहाचे दर वाढण्याची शक्यता आहे.