ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास आजपासून सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ डिसेंबर – यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारत यांच्यादरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीस आजपासून (गुरुवार) सुरुवात होत आहे. हा सामना दिवस-रात्री खेळविला जाणार आहे. याशिवाय या लढतीत गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे विराट ब्रिगेडला या मालिकेत ‘अग्निपरीक्षा’च द्यावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने गुलाबी चेंडूने सात कसोटी सामने खेळताना सर्व लढतींमध्ये विजय मिळविला आहे. याउलट भारताने इडन गाार्डनवर एकच सामना खेळताना बांगला देशवर विजय मिळविला आहे. सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात विराट ब्रिगेडचे यशापयश 50-50 असे आहे. ऑस्ट्रेलियाने तीन वन-डे सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली तर तीन टी-20 सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकत वन- डे मालिकेतील पराभवाची सव्याज परतफेड केली आहे. याशिवाय भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध गुलाबी चेंडूवर एक तीन दिवसीय सराव सामना खेळला तो अनिर्णीत राहिला.

आकडेवारीत ऑस्ट्रेलिया सरस वाटत असला तरी गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये भारताने बाजी मारली आहे. टीम इंडियाने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत 2-1 ने पराभूत केले होते. उल्लेखनीय म्हणजे भारताचा तो ऑस्ट्रेलियातील पहिला आणि ऐतिहासिक मालिका विजय ठरला होता.

दरम्यान, कोहलीने या सामन्यात शतक झळकावल्यास त्याच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद होणार आहे. कर्णधार म्हणून खेळताना विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 41 शतके ठोकत ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगशी बरोबरी साधली आहे. रिकीने इतकी शतके 324 तर विराटने अवघ्या 187 सामन्यांतच झळकावली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *