महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ डिसेंबर -कोरोनामुळे सांघिक तसेच अन्य खेळांवरही निर्बंध आले. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्याने तब्बल नऊ महिन्यांनंतर पुन्हा खो-खो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट या खेळांसाठी मैदाने गजबजू लागणार आहेत. या खेळांच्या सरावांना राज्य सरकारने परवानगी दिली असून सरकारच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा शासन आदेश शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केला आहे. सरकारने सरावाला परवानगी दिली असली तरी खेळाच्या स्पर्धा, कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येऊ नये असे या आदेशात स्पष्ट केले आहे.
सरावाच्या ठिकाणी 10 ते 15 खेळाडूंनी नेमून दिलेल्या जागेत सराव करणे अपेक्षित असणार आहे, तर 14 वर्षांखालील खेळाडूंसाठी सरावाच्या वेगळ्या वेळा आखण्यात येतील. याशिवाय खेळाडू किंवा पालक यांपैकी कोणालाही कोविडची लक्षणे दिसल्यास त्यांना सरावाच्या ठिकाणी येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.