महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ डिसेंबर – राज्यातील अनेक भागांत थंडीने हातपाय पसरले आहे. त्यामुळे ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत हुडहुडी कायम राहणार आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे ८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. पुण्यात किमान तापमानाचा पारा ८.३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. जम्मू आणि काश्मीर, हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टीचा प्रभाव कायम आहे. यामुळे उत्तर भारतातील थंडीच्या तीव्र लाटेमुळे राज्यातील किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.
विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा वगळता सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. मराठवाड्यात थंडीने चांगलाच जम बसविला आहे. औरंगाबाद, परभणी येथे किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली असल्याने चांगलीच थंडी होती. बीड, नांदेड, उस्मानाबाद भागांतही थंडीचा प्रभाव होता. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, नाशिक, निफाड या भागांत अधिक थंडी होती. तर कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर भागातही थंड वातावरण होते. कोकणातही थंडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली होती. तर किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
सहा अंश सेल्सिअसने घट
काही ठिकाणी दिवसाही थंडी जाणवत आहे. तसेच सायंकाळनंतर पुन्हा कडाक्याचे थंड वातावरण होत आहे. मध्यरात्रीनंतर गारठा वाढत जाऊन पहाटे थंडीचा कडाका वाढून किमान तापमानाचा पारा वेगाने खाली येत आहे. थंडीच्या कडाक्याने किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने घट झाली आहे.