महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ डिसेंबर – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीमधील सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. मदन लाल यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन तिन्ही अर्जांची तपासणी केल्यानंतर तीन नवीन निवड समितीची निवड केली. निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी कसोटीपटू चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. (Chetan Sharma will be head the selection panel)
माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविला आणि देवाशीष मोहंती यांची निवड समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Abey Kuruvilla and Debashish Mohanty appointed to the senior selection committee) निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी सर्वांधिक सामने खेळलेल्या अजित आगरकरचे नाव आघाडीवर होते, पण त्यांची निवड न झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चेतन शर्मा यांनी ११ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत २३ कसोटी आणि ६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १९८७ साली विश्वचषकात हॅटट्रिक केली होती. शर्मा यांनी वयाच्या १६ व्या वर्षी हरियाणासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. वयाच्या १८ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्यापूर्वी त्यांनी डिसेंबर 1983 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
मुख्य निवडक पदाच्या नियमांनुसार चेतन शर्मा यांच्या नावाची शिफारस सीएसीने केली. नियमानुसार सर्वात वरिष्ठ सदस्य (एकूण सर्वांधिक सामने खेळलेले) मुख्य निवड समिती अध्यक्ष होतो. नव्याने निवडण्यात आलेल्या तिघांच्या कार्यकाळानंतर सीएसी एक वर्षानंतर आढावा घेईल आणि पुन्हा या शिफारसी बीसीसीआयकडे पाठवेल. हे तीन सदस्य आता सुनील जोशी आणि हरविंदर यांच्यासमवेत टीम इंडियाची निवड करण्यासाठी काम करतील.
चेतन शर्मा यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट सेवा देण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी निश्चितच सन्मानाची गोष्ट आहे. मी जास्त बोलत नाही कारण फक्त माझे कार्य बोलेल. ते म्हणाले की, या संधीबद्दल मी फक्त बीसीसीआयचे आभार मानतो. माजी मध्यमगती गोलंदाज अभय कुरुविलाला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बड्या अधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला होता, त्यांना पश्चिम विभागातील अजित आगरकरपेक्षा प्राधान्य देण्यात आले होते.