महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ डिसेंबर – उत्तरेतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने केंद्र सरकार धास्तावले आहे. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने त्यात भर पडली आहे. त्यामुळे भाजपचे नेते अण्णांच्या मनधरणीसाठी राळेगणसिद्धीची वारी करून लागले आहेत. शेतक-यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे सोमवारी भेट घेतली होती. तर आज गुरूवारी भाजपचे माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगण सिद्धीत हजारे यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली.
हजारे यांच्या मागण्यांसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी स्वतः केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेणार चर्चा करणार असून या प्रश्नी लवकरच मार्ग निघेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे.शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात सन २०१८ व सन २०१९ मध्ये उपोषण केल्यानंतर पंतप्रधान कार्यालय व तत्कालिन केंद्रिय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी लेखी आश्वासन देऊनही त्याबाबत काहीही कार्यवाही न केल्याने हजारे यांनी पुन्हा उपोषण आंदोलनाचा इशारा केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांना पत्राद्वारे दिला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपच्या राज्यातील नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सोमवारी विधानसभेचे माजी सभापती बागडे व राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांनी भेट घेऊन हजारे यांच्याशी चर्चा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री यांच्याशी आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा करतो, आम्हाला थोडा वेळ द्या अशी विनंती त्यांनी हजारे यांच्याशी केली होती.महाजन यांनी हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हजारे यांनी केलेल्या विविध शेतक-यांच्या मागण्या, पत्रव्यवहार व उपोषणानंतर दिलेले लेखी आश्वासन यावर त्यांच्याशी चर्चा झाली. अण्णांच्या काही मागण्यांचा समावेश नवीन कृषी कायद्यात केला आहे. शेतमालाला दीडपट किमान हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.
गेल्या दहा वर्षांतील शेतमालाचे भाव पाहता मागील दोन तीन वर्षांत शेतमालाला चांगले भाव मिळत आहे. कपाशीला ५८०० रूपये प्रतिक्विंटल हमी भाव मिळत आहे. तूर, बाजरी, धान यांचेही भाव टप्प्याने वाढताना आपण पाहत आहोत.कृषीमूल्य आयोगाला निवडणुक आयोगाप्रमाणे स्वायत्तता द्यावी, स्वामिनाथन आयोगाप्रमाणे शेतमालाला दीडपट हमी भाव द्यावा, भाजीपाला व दुधाला हमी भाव द्यावा यासह काही अण्णांच्या मागण्या आहेत. त्या सर्वच तंतोतंत केंद्र सरकारने सोडविल्या नाहीत हे खरे आहे. परंतु, त्या मागण्यांची काही अंशी पूर्तता करून शेतक-यांचे हित केंद्र सरकार निश्चितच करीत आहे.
हजारे यांच्या मागण्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. तसेच फडणवीस व मी केंद्रिय कृषीमंत्री तोमर यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करणार आहोत. हजारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात लवकरच मार्ग निघेल असा आशावाद महाजन यांनी व्यक्त केला.