महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २७ डिसेंबर – महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. परिसरातील नैसर्गिक सौंदर्य उपभोगण्यासाठी तसेच सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाल्याने हॉटेल, लॉजेस हाऊसफुल्ल झाले आहेत. पहाटेच्या वेळी तापमानात जास्त घट झाल्यामुळे वेण्णा लेक, लिंगमळा परिसरात गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळत आहेत. ३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे व्यावसायिकांची उत्साह वाढला आहे.
अलिबागजवळ 4 किमीपर्यंत वाहनांची रांग
रायगड | सलग आलेल्या सुट्यांची संधी साधून पर्यटकांनी अलिबाग येथील समुद्र किनाऱ्याकडे धाव घेतली आहे. अलिबागजवळ वाहनांची ४ किमीपर्यंत रांग लागली आहे. मुंबई आणि पुण्याहून अलिबाग आणि मुरूडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागल्याने या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, मुंबई- पुणे महामार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दुसरीकडे धार्मिक स्थळीही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.