नवीन वर्षात ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे महागण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ डिसेंबर – एलईडी टीव्ही, फ्रिज आणि वाॅशिंग मशीनसारखी गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जानेवारीपासून १० टक्क्यांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे. तांबे, अॅल्युमिनियम, स्टीलसारख्या धातूंपाठोपाठ कच्च्या मालाच्या दरांत वाढ झाल्याने त्यापासून निर्मित उपकरणांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पुरवठा घटल्यामुळे टीव्ही पॅनलच्या (ओपन सेल) किमती दुपटीवर वाढल्या आहेत. भरीस भर म्हणून कच्च्या तेलाच्या दरांतील वाढीमुळे प्लास्टिकवरील खर्चही वाढला आहे.

एलजी, पॅनासॉनिक व थॉमसनसारख्या उत्पादकांनी जानेवारीपासून उत्पादनांच्या दरांत वाढची घोषणा केलेली आहे. सोनी इंडियाने म्हटले की, सध्या आम्ही स्थितीचा आढावा घेत आहोत. पॅनासॉनिक इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ मनीष शर्मा म्हणाले की, ‘भविष्यात कमोडिटीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे उत्पादनांच्या किमतीवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे आमचे मत आहे. जानेवारीपासून आमच्या उत्पादनांच्या किमती ६-७ टक्क्यांनी वाढणार आहेत. मार्चअखेरीपर्यंत त्यात १० ते ११ टक्क्यांची वाढ होऊ शकते.’

धातूंसोबतच कच्चा मालही महागला
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया जानेवारीपासून ७-८% वाढ करणार आहे. कंपनीचे उपाध्यक्ष (होम अप्लायन्सेस) विजय बाबू म्हणाले, ‘आम्ही टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज आदी उत्पादनांच्या किमती ७-८% पर्यंत वाढवणार आहोत. तांबे, अॅल्युमिनियमसारखे धातू व कच्च्या मालाचे दर वेगाने वाढले आहेत. क्रूडही महागल्याने प्लास्टिक सामग्रीवरील खर्चही वाढला आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *