दिलासा दायक बातमी ; पुणे शहर कंटेन्मेंट झोनमुक्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ जानेवारी – करोनाच्या विळख्यात सापडलेल्या पुणे शहराची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून त्याची नांदी म्हणजे आज पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त झालं आहे. शहरात आता एकही कंटेन्मेंट झोन उरलेला नसून मार्च महिन्यानंतर प्रथमच असं घडलं आहे.

राज्यातील करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. दुबई येथून परतलेल्या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर मुंबईसह राज्यात सर्वत्र करोना संसर्ग पसरला. सुरुवातीला मुंबई हा करोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र नंतर राज्यातील करोना साथीचा केंद्रबिंदू पुण्याकडे सरकला. पुण्यातील मृत्यूदरही मोठा असल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र, आरोग्य यंत्रणांचे अथक प्रयत्न, पालिका व शासनाने उपलब्ध केलेल्या आरोग्य सुविधा यामुळे करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुकारलेल्या लढ्याला बळ मिळत गेलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पुण्यात जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला होता. त्याचवेळी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारकाईने लक्ष देत सर्व यंत्रणांना वेळोवेळी सूचना दिल्या तसेच या लढ्यात कोणतीही उणीव भासू दिली नाही. करोनावरील उपचारांत कोणतीही कुचराई होऊ नये म्हणून पुण्यात जंम्बो आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या. लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पोलीस यंत्रणेनेही झोकून देऊन काम केले. या साऱ्याचा परिपाक म्हणून पुण्याची वाटचाल आता करोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. करोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने कालच पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्यापासून (१ जानेवारी) या कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेतले जाणार नाहीत. या बातमीनंतर आज कंटेन्मेंट झोनबाबतची बातमी आणखी दिलासा देणारी ठरली आहे. पुणे महापालिका हद्दीत आता एकही कंटेन्मेंट झोन नसून पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त शहर बनलं आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, डिसेंबरच्या सुरुवातीला पुण्यात ६ कंटेन्मेंट झोनची घोषणा करण्यात आली होती. त्याआधी नोव्हेंबरमध्ये ही संख्या १३ होती तर ऑक्टोबरमध्ये पुण्यात ३३ कंटेन्मेंट झोन होते. त्याआधी करोना साथीने थैमान घातले असताना कंटेन्मेंट झोनची संख्या १०० पर्यंत गेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *