महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी -भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका तूर्तास १-१ अशी बरोबरीत असून ७ जानेवारीपासून सिडनी येथे तिसऱ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. या सामन्यात भारतीय संघापुढे सर्वात मोठा प्रश्न तिसरा वेगवान गोलंदाज कोण? हा आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अनुभवी मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात उमेश यादवही दुखपतीमुळे बाहेर पडला. उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्याजागी अनुक्रमे नटराजन, शार्दुल ठाकूर यांना भारतीय संघात स्थान मिळालं आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाकडे उनुभवी गोलंदाजाची भूमिका कोण पार पडणार? दुसऱ्या कसोटीत यशस्वी पदार्पण करणाऱ्या सिरज आणि अनुभवी बुमराह यांच्याजोडीला तिसरा वेगवान गोलंदाज कोण ? हा प्रश्न संघ व्यवस्थपनाबरोबर क्रीडा चाहत्यांना पडला आहे.
२९ वर्षीय नटराजनने ‘आयपीएल’मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना सर्वाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठीसुद्धा प्रथमच भारताकडून खेळण्याची संधी लाभली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन, तर तीन लढतींच्या ट्वेन्टी-२० मालिकेत सहा बळी मिळवून नटराजनने आपली निवड सार्थ ठरवली. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज यांच्या साथीने तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून नटराजनला संधी लाभणार का, हे पाहणे रंजक ठरेल. नटराजनव्यतिरिक्त शार्दूल आणि नवदीप सैनीसुद्धा तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचे स्थान पटकावण्याच्या शर्यतीत आहेत.
नवदीप सैनी आणि नटराजन यांच्या तुलनेत मुंबईकर शार्दुल ठाकूरचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अनुभव जास्त आहे. नटराजन यांनं प्रथम श्रेणीमध्ये फक्त एक सामना खेळला आहे. शार्दुल ठाकूरनं २०१८ मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं होतं. वेस्ट विंडिजबरोबर झालेल्या पदार्पाणाच्या सामन्यात त्याला दुखापत झाल्यामुळा सामना अर्धवट सोडावा लागला होता. त्यानंतर शार्दुल ठाकूरला कसोटी संघात स्थान मिळालं नव्हते. गोलंदाजीशिवाय शार्दूल ठाकूर चांगली फलंदाजीही करु शकतो, ही त्याची जमेची बाजू ठरू शकते. शार्दुलच्या समावेशामुळे भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत होऊ शकते. त्यामुळे कसोटी शार्दुल ठाकूरचं पारडं जड आहे.
“अनेकांना असं वाटतंय की नटराजनला कसोटी संघात जागा मिळावी, त्याने टी-२० आणि वन-डे मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे सर्व प्रभावित आहेत. परंतू आपल्याला हे विसरुन चालणार नाही की तो तामिळनाडूकडून फक्त एक प्रथमश्रेणी सामना खेळला आहे. शार्दुलकडे मुंबईकडून रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे.” BCCI मधील सूत्रांनी पीटीआयला माहिती दिली. शार्दुलचं पारडं जड असले तरीही तिसरा वेगवान गोलंदाज कोण? याचा निर्णय याचा अंतिम निर्णय प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि कर्णधार अजिंक्य रहाणे घेणार असल्याचं कळतंय.