महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ जानेवारी – कोणत्याही क्षणी लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश चीनचे राष्ट्रपतीशी जिनपिंग यांनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला दिले आहेत. भारत आणि अमेरिकेसोबत चीनचे संबंध ताणले गेले असताना जिनपिंग यांनी हे आदेश दिले आहेत. लष्कराने युद्धाची तयारी अधिक जलदपणे करण्याचे आदेश दिले असून जवानांना प्रत्यक्ष युद्धात उतरवण्यासाठी प्रशिक्षित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.
‘सैनिकांची क्षमता वाढविण्यासाठी आघाडीवरील चकमकींचा उपयोग करून घ्या आणि प्रशिक्षणामध्ये अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा,’ असेही जिनपिंग यांनी म्हटले आहे. तुम्ही सर्व काळ युद्धसज्ज असले पाहिजे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. ‘सार्वकालिक युद्धसज्जता वाढविण्यासाठी सशस्त्र दलांनी प्रत्यक्ष युद्धजन्य स्थितीतील सराव करावा,’ असा सल्लाही जिनपिंग यांनी दिल्याचे ‘शिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
सरसेनापती या नात्याने यंदा लष्कराला दिलेल्या पहिल्या आदेशात जिनपिंग यांनी लष्करी प्रशिक्षण आणि युद्धजन्य स्थितीतील सराव आणि जिंकण्याची क्षमता वाढवणे यावर भर दिला आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीसी) शंभरावा स्थापनादिन यंदा एक जुलैला आहे. त्या दिवशी नेत्रदीपक कामगिरी करून दाखविण्यासाठी ‘सीपीसी’ आणि सेंट्रल मिलिटरी कमिशन (सीएमसी) यांच्याकडून येणाऱ्या आदेशाची निग्रहाने अंमलबजावणी करावी, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे वृत्तात म्हटले आहे.
युद्धसरावामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचा आदेश देऊन जिनपिंग यांनी म्हटले आहे, की लष्कराने ताज्या घडामोडींची आणि उच्च तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती घ्यावी. त्यात कम्प्युटर सिम्युलेशन, ऑनलाइन युद्धतंत्र, प्रशिक्षणातही उच्च तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवनवी यंत्रे समाविष्ट करावीत असेही जिनपिंग यांनी म्हटले.