महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ जानेवारी -तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज (8 जानेवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती. त्याची दखल घेत, आता एमपाएससीची परीक्षा लवकरच घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षांबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखांची अधीकृत घोषणा आज केली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर दुय्याम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा याच वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. या सर्व परीक्षांची अधिकृत घोषणा राज्य सरकारतर्फे आज ( शुक्रवार 8 जानेवारी) होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याच निर्णय
दरम्यान मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.