महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ जानेवारी -दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ती मोडीत काढण्यासाठी अमेरिका आणि जपानने मिळून आता नवी रणनीती आखलेली आहे. विवादास्पद भागातील चीनच्या चाली उधळून लावण्यासाठी अमेरिका आणि जपानने ब्रिटनसह फ्रान्स, जर्मनी, इटलीसारख्या बलशाली लष्कर असलेल्या देशांना दक्षिण चिनी समुद्रात आवतन दिले आहे.
‘ड्रॅगन’चा गळा आवळण्यासाठी या देशांनीही हे आमंत्रण सहर्ष स्वीकारल्याचे वृत्त असून, त्यामुळे चीनमध्ये एकच खळबळ उडालेली आहे. चालू 2021 वर्षात युरोपियन देश आपल्या सामरिक धोरणांतर्गत मोठ्या प्रमाणावर हिंद-प्रशांत (इंडो-पॅसिफिक) क्षेत्राला प्राधान्य देत आहेत. येत्या काही महिन्यांतच ब्रिटन आपल्या ‘क्वीन एलिझाबेथ’सारख्या विमानवाहू युद्धनौका पूर्व आशियात तैनात करणार आहे. दुसरीकडे, फ्रान्सही जपानसाठी आपले नौसैनिक दल रवाना करत आहे. जर्मनीही अशीच एक मदत पाठविणार आहे.
दक्षिण चिनी समुद्रात तसेच पूर्व चिनी समुद्रात चीनच्या लष्करी कारवाया सातत्याने वाढतच आहेत. चीनने सगळे आंतरराष्ट्रीय संकेत झुगारून या दोन्ही भागांतील निर्जन बेटांवर आपली लष्करी ठाणी विकसित केली आहेत. इतरांच्या भूभागावर ताबा मिळविण्याच्या ‘ड्रॅगन’च्या भुकेने ब्रुनेई, मलेशिया, फिलिपाईन्स, तैवान आणि व्हिएतनाम हे लगतचे देश हैराण झालेले आहेत.