व्हॉटस् अ‍ॅपचे नवे नियम ; सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता ?

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ जानेवारी – अख्खे जग व्हॉटस् अ‍ॅपने व्यापल्यावर तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती आपोआप व्यावसायिक हेतूसाठी उपलब्ध करणारा नवा नियम 8 फेब्रुवारीपासून लागू केल्याने भारतातील तब्बल 40 कोटी युजर्सना तो अत्यंत घातक ठरू शकतो. यातून सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ कायदा केला पाहिजे, असा इशारा आयटी तज्ज्ञांनी दिला आहे.

फेसबुकने व्हॉटस् अ‍ॅप कंपनी विकत घेतल्यापासून गेल्या चार वर्षांत फेसबुकलाही मागे टाकत व्हॉटस् अ‍ॅप युजर्सची संख्या आज जगात 200 कोटींवर पोहोचली आहे. हा उच्चांक गाठताच व्हॉटस् अ‍ॅपवरील युजर्सचा सर्व डेटा (उदा., वैयक्तिक माहिती, तुमचे सर्व संपर्क मोबाईल नंबर) हे आपोआप व्यावसायिक वापरासाठी तुमच्या परवानगीशिवाय शेअर होतील. ती परवानगी देण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 ही आहे. या तारखेपर्यंत जर तुम्ही व्हॉटस् अ‍ॅपचा नवा नियम स्वीकारला, तरच तुमचे व्हॉटस् अ‍ॅप अकाऊंट सुरू राहणार आहे; अन्यथा ते बंद केले जाणार आहे. युरोपातील अनेक देश व अमेरिकेने या नव्या नियमाला आव्हान देणारे कायदे करून आपल्या देशातील व्हॉटस् अ‍ॅप युजर्सला अभय दिले. मात्र, भारताने या नव्या नियमाबाबत अजून कोणताच कायदा न केल्याने देशातील 40 कोटी व्हॉटस् अ‍ॅप युजर्स खूप चिंतेत आहेत. कारण, व्हॉटस् अ‍ॅपची इतकी सवय झाली आहे की, ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच बनल्याने ते बंद करणे परवडणारे नाही.


नव्या नियमाबाबत व्हॉटस् अ‍ॅप युजर्समध्ये अनेक गैरसमज आहेत.त्यात तुमचा ऑडिओ व व्हिडीओ कॉलही रेकॉर्ड होईल, अशी भीती आहे. मात्र, आयटी तज्ज्ञांनी सांगितले की, ठरवले तरी हे शक्य नाही. कारण, हे कॉल एंड टू एंड इन्स्क्रीप्शन या प्रणालीवर चालतात. याचा अर्थ असा की, तुमचा कॉल हा कोडच्या रूपात परावर्तीत होतो. तो पाहण्याचा प्रयत्न केला, तरी गारबेज स्वरूपात (निरुपयोगी) दिसतो. मात्र, या डेटा शेअरिंगमधून सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो, असा इशारा आयटी तज्ज्ञांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *