महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी- कोरोनाच्या तीव्र संसर्ग काळात मुंबई महापालिकेचे नायर रुग्णालय हे सर्वात आधी संपूर्णंता कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळे या रुग्णालयात लसीकरणाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शुक्रवार सायंकाळपासून उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. शनिवारी सकाळी लसीकरण केंद्रातून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाने ‘आम्ही लस घेतली तुम्हीही निर्धास्तपणे घ्या’ असा संदेश दिला.
नायर रुग्णालयात लसीकरण केंद्राबाहेर प्रतीक्षा कक्ष तयार केला असून येथे बसून अनेक जण आपला नोंदणी क्रमांक पुकारण्याची वाट पाहत बसले होते. अन्य कर्मचारी-अधिकारी आणि डॉक्टरांना फिजिकल डिन्स्टसिंग पाळून कक्षाच्या गेटजवळ रांगेत उभे करण्यात आले होते. या केंद्राच्या मुख्य लसीकरण कक्षात एकाच वेळी सहाहून अधिक जणांना लस देण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याशेजारी निरीक्षण कक्ष तयार करण्यात आला आहे.
या ठिकाणी लसीचा डोस घेणारा प्रत्येक जण अत्यंत आनंदी हाेता, शिवाय प्रत्येक जण लसीकरण कक्षात लस घेतानाचा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी धडपडताना दिसून आला. नायर रुग्णालयात लसीकरण केंद्राबाहेर पालिकेच्या वतीने ‘मी लस घेतली, लस घेतल्याचा आनंद आहे’ असे भित्तीपत्र लावण्यात आले होते. लसीकरण कक्षाबाहेर येणारे बरेच कर्मचारी – अधिकारी त्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा आनंद घेत होते.