राज्यात थंडीचा कडाका वाढणार; गोंदियात नीचांकी तापमान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी- या आठवड्याची सुरुवातच गुलाबी थंडीने झाली आहे. मध्यंतरी निर्माण झालेले ढगाळ वातावरण बेपत्ता झाले असून उत्तरेकडील वाऱ्यांचा परिणाम आता जाणवू लागला आहे. त्यामुळे, शनिवारी गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ८.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. (gondia recorded the lowest temperature in the state at 8.6 degrees)

थंडी जाणवू लागली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच शहरातील ढगाळ वातावरणाने निरोप घेतला. वातावरण कोरडे झाले आणि पाऱ्यात घसरण झाली. गोंदिया खालोखाल ब्रह्मपुरी येथे १२.२ आणि १२.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मध्यंतरी कपाटात गेलेले स्वेटर्स, मफलर आता बाहेर निघालेत. पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहणार असून थंडीही कायम राहणार आहे. केवळ २० जानेवारी रोजी विदर्भात किंचित ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने त्या दिवशी तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमध्ये पारा खूपच खाली घसरला असल्याने आता राज्यातही अनेक भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ कोकणात थंडी चांगलीच जाणवणार आहे. याबरोबरच २२ आणि २३ जानेवारीनंतर पुणे आणि नाशिकचे तापमान १२ अंश सेल्सिअसच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातील तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून गारवा जाणवू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *