महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी- देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असताना महाराष्ट्रात कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे १७ आणि १८ जानेवारीपर्यंत लसीकरण थांबविण्यात आल्याचं वृत्त प्रसारित झालेलं होतं. मात्र, हे वृत्त राज्याच्या आरोग्य विभागानं फेटाळलं आहे.
कोविड १९ लसीकरणासाठी ऑफलाइन नोंदणी करू नये आणि कोविन ॲप मार्फतच नोंदणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे रविवारी आणि सोमवारी मुंबईसह राज्यात लसीकरण होणार नाही. कोविन ॲपबाबतचे तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतरच पुढील लसीकरणाला सुरुवात होईल, असे वृत्त माध्यमांमधून प्रसारित झाले होते.
राज्यातील कोरोना लसीकरण स्थगित कऱण्यात आलेलं नाही, असे स्पष्टीकरण राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेले आहे. यावर सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केलेलं आहे की, “महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण रद्द करण्यात आलेलं नाही. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील आठवड्यात ४ दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे”, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केलेलं आहे.