महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. तत्पूर्वी आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात त्यांनी भारतातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणाबाबत बोलताना हे जगातील सर्वांत मोठे लसीकरण असल्याचे सांगितले. त्यांनी असे का सांगितले असावे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्यांनी जे काही सांगितले आहे, ते अगदी खरे आणि बरोबर सांगितलेले आहे. पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांचे लसीकरण कोणत्याही देशात झालेले नाही. जगातील 100 देशांची तर एवढी (3 कोटी) लोकसंख्याही नाही.
दरम्यान, दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी तसेच नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टरांनी ‘कोव्हॅक्सिन’ या भारत बायोटेकच्या स्वदेशी लसीला टोचून घेण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये एका लसीकरण केंद्रावर कोव्हिशील्ड लस टोचली जाईल असे गृहित धरून डॉक्टर तेथे पोहोचले. परंतु कोव्हॅक्सिन लस देणार असल्याचे समजताच डॉक्टरांनी काढता पाय घेतला.
असाच काहीसा प्रकार दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात घडला. तेथील काही निवासी डॉक्टरांनी ‘कोव्हॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अपूर्ण असल्याने काळजी वाटत असल्याचे सांगितले. दरम्यान, सर्व 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 3 हजार 6 ठिकाणांवर एकाचवेळी ही मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रन्टलाईन वर्कर्सचे लसीकरण होत आहे.
पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी किमान 100 लोकांना लस टोचली जाईल. थोडक्यात, देशभरात शनिवारी 3 लाख 15 हजार 37 लोकांना लस देऊन झालेली असेल. फ्रन्टलाईन वर्कर्समध्ये सुरक्षा दल, पोलिस, अग्निशमन कर्मचारी तसेच सफाई कर्मचार्यांचा समावेश आहे. त्यांच्या लसीचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. पहिला डोस देऊन झाल्यानंतर दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे. दुसर्या डोसबद्दल फोनवरून सूचना देण्यात येणार आहे.