करोना लसीकरण मोहिमेत सव्वादोन लाख करोनायोद्धय़ांना लस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी- देशव्यापी करोना लसीकरण मोहिमेत दोन दिवसांत दोन लाख २४ हजार ३०१ करोनायोद्धय़ांना लस टोचण्यात आली. त्यापैकी ४४७ जणांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने रविवारी दिली.

आरोग्य विभागाने पत्रकार परिषदेत लसीकरण मोहिमेची आकडेवारी जाहीर केली. ‘‘लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दोन लाख सात हजार २२९ करोनायोद्धय़ांचे लसीकरण करण्यात आले, तर रविवारी सुटीचा दिवस असल्याने केवळ सहा राज्यांमध्ये लसीकरण करण्यात आले. त्यात ५५३ सत्रांमध्ये १७ हजार ७२ जणांना लस टोचण्यात आली’’, असे आरोग्य विभागाने जाहीर केले. रविवारी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मणिपूर आणि तमिळनाडूमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले. लस घेतलेल्या ४४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. त्यापैकी तिघांना रुग्णालयात दाखल करावे लागले, परंतु इतरांमध्ये ताप, डोकेदुखी आणि मळमळ अशी किरकोळ लक्षणे आढळली.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची रविवारी बैठक घेण्यात आली. त्यात लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्याबरोबरच मोहिमेतील अडथळे आणि नियोजनातील त्रुटी दूर करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भारताच्या औषध महानियंत्रकांनी ‘कोव्हीशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सीन’ या दोन लशींना मान्यता दिली असून, देशात शनिवारी लसीकरणास प्रारंभ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *