महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी- महाराष्ट्रात एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्यानं आज 12 हजार 711 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी करण्यात येणार आहे. गावपातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदार नेमका कुणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे.राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी (gram panchayat election result 2021 ) मतदान पार पडलं. आता गावाचा गाडा नेमका कोण हाकणार याचा फैसला पुढच्या काही तासात लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी श्वास रोखले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाला होत्या त्या पैकी 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता 63 ग्रामपंचायतींच्या निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहेत. खेडमधील सर्वात मोठी 15 जागा असणारी ग्रामपंचायत भरणे असून खेडमध्ये आता 64 ग्रामपंचायतींमध्ये 157 प्रभागातील निवडणुकीसाठी 685 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय दृष्टया शिवसेना, मनसे, आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये चुरस असून खेडमधील भरणे आणि भडगाव या दोन ग्रामपंचायती तिन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा दावा असून आता होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे पारडे जड होते. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागातील मालेगाव,येवला,चांदवड, नांदगाव, बागलाण आणि देवळा या 6 तालुक्यातील 303 ग्रामपंचायतीच्या 2 हजार 479 जागांसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या मतदानाच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजेपासून सुरुवात केली जाणार आहे. काही ठिकाणी 12 तर काही ठिकाणी 16 टेबल लावण्यात आले असून मतमोजणीचे 6 फेऱ्या होणार आहे. 2 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
काही ग्रामपंचायतीमध्ये सरळ एकास एक तर काही ठिकाणी तिरंगी लढत झाली असून आता निकाल काय लागतो याकडे राजकीय पक्षां सोबत जनतेचे लक्ष लागले आहे.
