महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी- केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सुमारे दहा लाख कोरोनाचे डोस उपलब्ध झाले आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सुमारे आठ लाख आरोग्य योद्ध्यांची को-विन अॅपवर नोंद झाली आहे.एका व्यक्तीला दोन डोस द्यावे लागत असल्याने सुमारे 16 लाख डोसची महाराष्ट्राला गरज आहे. दहा टक्के तूट यानुसार महाराष्ट्राला साडेसतरा लाख डोसची गरज आहे. सुमारे दहा लाख डोस राज्याला उपलब्ध झाले असून साडेसात लाख डोस अजून मिळावेत यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जालना येथील कोरोना लसीकरण केंद्र येथे ते पत्रकारांशी बोलत होते. श्री.टोपे म्हणाले, की राज्यात २८५ ठिकाणी पहिल्या टप्प्यातील २८ हजार ५०० आरोग्य योद्धांना कोरोना लसीकरण केले जात आहे. शनिवारपासून संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूवर शोधलेली कोरोना लस आरोग्य योद्ध्यांना देण्यास सुरूवात होत आहे. जालना येथे चार केंद्रांवर कोरोना लसीकरण होणार आहे. जालना जिल्हा रूग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे व्हीसीव्दारे संवाद साधत कोरोना लसीकरणाचे उद्घाटन केले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांच्या निवडक डॉक्टर, नर्स, अधिकारी या व्हीसीला उपस्थित होते.