महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी- कृषी कायदे रद्द करणार नाही. या मागणीशिवाय दुसरे काहीतरी मागा, अशी ऑफर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी रविवारी शेतकऱ्य़ांपुढे ठेवली. शेतकऱ्य़ांनी 19 जानेवारीच्या बैठकीत एकेक क्लॉजवर चर्चा करावी आणि कायदे रद्द करण्याशिवाय दुसरे काय पाहिजे ते सांगावे, असे ते म्हणाले.
याआधी शेतकरी संघटनांबरोबर चर्चेच्या नऊ फेऱ्य़ा निष्फळ झाल्या आहेत. आता 19 जानेवारीला पुन्हा सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा होणार आहे. या अनुषंगाने कृषी मंत्री तोमर यांनी रविवारी केंद्राची ताठर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तोडगा काढण्याबाबत शेतकरी संघटनाच नरमाई घ्यायला तयार नसल्याचे खापर फोडले.
ते म्हणाले, शेतकरी संघटना अजिबात नरमाई घ्यायला तयार नाहीत, कायदे रद्द व्हावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करताहेत. याऐवजी शेतकऱ्य़ांनी कृषी कायद्यांतील प्रत्येक क्लॉजवर चर्चा करावी आणि कुठे त्रुटी आहेत ते सांगावे. केंद्र सरकार ज्यावेळी कोणताही कायदा बनवते, त्यावेळी तो संपूर्ण देशासाठी असतो. कृषी कायद्यांना देशातील बहुतांशी शेतकरी, विचारवंत, वैज्ञानिक, कृषी क्षेत्रात काम करणारे लोक सहमत आहेत, असा दावा तोमर यांनी या वेळी केला.
शेतकरी संघटनांनी सरकारच्या कुटील धोरणांवर हल्लाबोल केला आहे. काही लोक सरकारच्या सांगण्यावरून आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिल्लीवर जणू युद्ध छेडले जात असल्याचा प्रचार केला जात आहे. आमचे आंदोलन धोरणांविरोधात आहे. आम्ही आमच्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने 26 जानेवारीला दिल्लीत धडकणार आहोत. आंदोलनात फूट पाडू, असा सरकारचा भ्रम आहे, परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही, असा इशारा किसान संघर्ष समितीचे नेते मनदीप नथवान यांनी दिला.