महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ जानेवारी – कोरोनाचं (coronavirus) निदान करण्यासाठी कोरोना टेस्ट (corona test) करावी लागते. तर काही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणंच दिसत नाहीत, त्यामुळे ते कोरोना टेस्टही करून घेत नाहीत. पण आता कोरोना टेस्ट न करता तुम्ही सुरुवातीलाच आपल्याला कोरोना आहे की नाही, याचं निदान करू शकता. तुमचं स्मार्टवॉच (Smartwatch) तुम्हाला कोरोना आहे की नाही हे सांगू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
अॅपल वॉचसारखी स्मार्टवॉचेस, गार्मिन आणि फिटबिटसारख्या कंपन्यांनी बनविलेली फिटनेस ट्रॅकर्स उपकरणं लक्षणं न दिसणाऱ्या कोविड बाधित रुग्णांचं निदान करू शकतो. असा दावा न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई हेल्थ सिस्टम, कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठ अशा विविध संस्थांनी केलेल्या संशोधनात केला आहे.
या अभ्यासानुसार, फिटबिट, गार्मीन आणि अॅपल वॉचसारखी हेल्थ ट्रॅकर्स हृदयाच्या ठोक्यांमधील बदल ओळखू शकतात. आपल्या शरीरात काहीतरी चुकीचं घडलं आहे हे शोधण्यासाठीचं हे मान्यताप्राप्त परिमाण आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हृदयाच्या ठोक्यांमधील बदल मोजण्याचं हे परिमाण म्हणजे हृदयाच्या दोन ठोक्यांमधील वेळ मोजला जातो. आपली तब्येत ठीक असेल आणि शरीराला कोणत्याही संसर्गाचा त्रास होत नसेल तर ज्या परिस्थितीत आहात त्यानुसार आपल्या हृदयाचा वेग बदलणं सर्वसामान्य आहे. उदाहरणार्थ, तणाव, निवांत, कोणताही ताण नसलेली स्थिती आणि त्या त्या वेळची परिस्थिती यावर आपली मज्जासंस्था ज्याप्रमाणे प्रतिसाद देते त्यानुसार हृदयाची गती बदलू शकते. पण आपल्या शरीराला कोणताही संसर्ग झाला असल्यास आणि इन्फ्लेमेशन, सूज असल्यास मज्जासंस्था मंद गतीनं प्रतिक्रिया देते, ज्यामुळे हृदयाची गती कमी होते.
अॅपल वॉच, गार्मिन, फिटबिट किंवा अशा उपकरणाच्या कोणत्याही उत्पादक कंपनीनं हे संशोधन प्रायोजित केलेलं नाही, असंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. आता यापुढं कोणतीही ट्रॅकर्स हृदयाच्या ठोक्यांमधील विसंगतींच्या आधारे डॉक्टरांना भेट देण्याची सूचना देऊ शकतात का, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. अनेकदा हृदयविकाराचा झटक्याची पूर्वसूचना देण्यात अॅपल वॉच यशस्वी ठरलं असून, त्यामुळं लोकांचे प्राण वाचले आहेत. अलिकडच्या काळातले हे संशोधन स्मार्टवॉच आणि ट्रॅकर्सची उपयुक्तता अधोरेखित करण्यात महत्त्वाचं ठरलं आहे.