आधीच्या विषय निवडीनुसार परीक्षेची अंतिम संधी ; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ जानेवारी – शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इयत्ता बारावीकरिता सुधारित विषय योजना आणि सुधारित मूल्यमापन योजना निश्‍चित केली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना ऐनवेळी विषय बदलावे लागत असून, सध्याच्‍या परिस्थितीत अध्ययनातही मर्यादा येणार आहेत. त्‍यामुळे योजनेस यंदाच्‍या वर्षापुरती स्‍थगिती देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ, पालक आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता.


या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम संधी म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

बारावी बोर्ड परीक्षेला सुधारित विषय योजना आणि सुधारित मूल्‍यमापन योजनेच्‍या अंमलबजावणीच्‍या पहिल्या वर्षीच विद्यार्थ्यांना विषय निवडताना आणि त्‍यानुसार राज्‍यमंडळाच्‍या परीक्षेची आवेदन पत्रं भरताना अनेक विद्यार्थ्यांना अडच‍णी निर्माण झाल्‍या आहेत. याबाबतीत निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी अकरावीला आवडीनुसार प्रवेश घेताना प्रचलित पद्धती, उपलब्‍ध विषय निवडलेले होते. मागील वर्षी अभ्यासलेले विषय आणि त्‍याबाबत असलेल्या आवडीनुसार, विद्यार्थ्यांनी बारावीतही मागील वर्षाचे विषय कायम ठेवले. या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयं अद्याप पूर्ण क्षमतेनं सुरु झालेली नसून, ऐनवेळी विषय बदलून परीक्षा देणं विद्यार्थ्यांच्‍या हिताचं नाही. अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होऊन त्‍यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण केली जात होती.

दरम्यन, पुढील वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना अशी सवलत देता येणार नाही आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी सुधारित मूल्यमापन योजनेची अमलबजावणी करणं अनिवार्य असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थी शिकत असलेले काही विषय माहितीअभावी बंद झालेले विषय आहेत. त्यामुळे बंद करण्यात आलेल्या विषयांचे अध्यापन तातडीनं बंद करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या असून शिक्षण संचालक, यांनी सर्व संस्थाचालकांच्या ही बाब निदर्शास आणून देण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *