इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी आज संघनिवड ; विराट कोहली इशांत शर्मा पुन्हा ऍक्शनमध्ये दिसणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ जानेवारी – इंग्लंडविरुद्ध होणाऱया पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची निवड मंगळवारी करण्यात येणार असून पितृत्वाच्या रजेवर असणारा कर्णधार विराट कोहली व दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या मालिकेत पुन्हा ऍक्शनमध्ये दिसणार आहेत.

सध्या ब्रिस्बेनमध्ये सुरू असलेल्या कसोटीत बुमराह व रविचंद्रन अश्विन दुखापतीमुळे सहभागी होऊ शकले नाहीत. पण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी ते उपलब्ध राहण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्ध एकूण चार कसोटी होणार असून त्याची सुरुवात 5 फेब्रुवारी रोजी चेन्नईतील कसोटीने होणार आहे. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, उमेश यादव, हनुमा विहारी यांना दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याने ते मात्र निवडीसाठी उपलब्ध असणार नाहीत.

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समिती संघात कोणतेही अनपेक्षित वा मोठे बदल करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियात खेळत असलेले व पूर्ण फिट असलेल्या खेळाडूंना निवडले जाणार, हे निश्चित आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ याला मात्र वगळण्यात येण्याची शक्यता आहे. निवडण्यात आलेल्या संघाला 27 जानेवारीपासून जैवसुरक्षित कवचात रहावे लागणार आहे. पहिल्या दोन कसोटी चेन्नईत होणार असल्याने फक्त त्या सामन्यांसाठीच संघनिवड करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. 5-9 फेब्रुवारीस पहिली व 13-17 फेब्रुवारीस दुसरी कसोटी होणार आहे. 16 ते 18 खेळाडूंची निवड केली जाणार असून नेटबॉलर्सही निवडले जाणार आहेत. सायंकाळी 5 वाजता निवड समितीची बैठक होणार आहे.

निवडले जाणारे संभाव्य खेळाडू ः शुभमन गिल, रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, टी.नटराजन, रविचंद्रन अश्विन, शाहबाज नदीम, कुलदीप यादव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *