किसान विकास पत्र : पोस्टाच्या या योजनेत सुरक्षित गुंतवणूक, पैसे होतील दामदुप्पट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ जानेवारी -कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (Corona Virus Pandemic) जगभरातील अर्थव्यवस्था (Global Economy) डळमळीत झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार (Investment) कमी जोखीम असलेल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासदेखील घाबरत आहेत. सध्याच्या वातावरणात, लोकांना असे गुंतवणूक पर्याय हवे आहेत, ज्यामध्ये जोखीम कमी आणि फायदा चांगला आहे. तुम्हीही अशाच गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसची (Post Office) ही योजना एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट खात्याची किसान विकास पत्र योजना (Kisan vikas Patra) ही अशीच एक योजना आहे.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे नेहमीच चांगलं मानलं जातं. पोस्टाच्या अशा काही योजना आहेत ज्यात कोणत्याही जोखमीशिवाय पैसे दुप्पट केले जातात. त्यापैकीच एक आहे किसान विकास पत्र योजना.

किसान विकास पत्र (KVP) योजना भारत सरकारनं अनेक वर्षांपूर्वी दाखल केलेली एकरकमी गुंतवणूक योजना आहे. यामध्ये तुम्ही दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक गुंतवणूक करू शकत नाही. यात एकाच वेळी गुंतवणूक (One Time Investment) करता येते.

ही योजना देशातील सर्व टपाल कार्यालयं आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणूकदारांना मुदत संपल्यानंतर गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मिळते. यासाठी किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे; मात्र गुंतवणूकीच्या रकमेसाठी कमाल मर्यादा नाही. एक हजारच्या वर तुम्ही कितीही रक्कम या योजनेत गुंतवू शकता. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे. यात गुंतवणूक करून ते दीर्घ मुदतीसाठी त्यांचे पैसे वाचवू शकतात.

या योजनेची मुदत 124 महिने म्हणजेच 10 वर्षं 4 महिने आहे. किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास रक्कम 124 महिन्यांत दुप्पट होईल. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवरील व्याजाच्या आधारावर ही रक्कम दुप्पट होते. या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदाराला या योजनेअंतर्गत कर्जही अगदी स्वस्त व्याजदरानं घेता येतं. त्यासाठी अटीही अगदी सोप्या आहेत. तुम्ही आर्थिक संकटात असाल आणि या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली असेल; तर तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी अगदी कमी व्याजदरानं अगदी सहजपणे कर्ज मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *