तर अशा व्यक्तींनी कोवॅक्सीन लस घेऊ नये; ‘भारत बायोटेक’नेचं केलं आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २०. जानेवारी – भारत बायोटेकच्या करोनावरील कोवॅक्सीन या लसीला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआयने आप्ताकालीन वापरासाठी परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भातील पारदर्शकतेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचदरम्यान आता भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन ही २०० टक्के सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून आम्ही सर्व वैज्ञानिकांचे सल्ले गांभीर्याने घेतो, असंही कृष्णा म्हणाले होते. कोवॅक्सीनच्या प्रतिकूल परिणामांबद्दल म्हणजेच साइड इफेक्टबद्दल बोलताना कृष्णा यांनी कोणालाही इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषध सुरु असतील तर त्यांनी सध्या कोवॅक्सीन घेऊ नये असं सांगितलं आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सीनसंदर्भातील सर्व शंका दूर करण्यासाठी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.

यापूर्वी सरकारने इम्यूनो सप्रेसेंट किंवा इम्यूनो डेफिशिएन्सी असणाऱ्या व्यक्तींनाही कोवॅक्सीने घेता येईल असं म्हटलं होतं. मात्र चाचण्यांदरम्यान अशा व्यक्तींवर करोनाची लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचं दिसून आलं. सामान्यपणे केमोथेरपी करणारे कॅन्सरचे रुग्ण, एचआयव्हीचा संसर्ग झालेले रुग्ण आणि स्टेरॉइडचे सेवन करणारे इम्यूनो-सप्रेस्ड असतात. म्हणजेच अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते.

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनाही कोवॅक्सीन घेऊ नये असं म्हटलं आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी आहे त्यांनाही कोवॅक्सीन घेऊ नये असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच नवजात बालकांच्या मातांनाही सरकारने लसीकरणाच्या कार्यक्रमातून यापूर्वीच वगळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *