महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ जानेवारी – आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. 9 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरता येणार असून त्यासाठी 26 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यंदा प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांसाठी एकच सोडत काढण्यात येणार आहे. 5 मार्च रोजी ही सोडत काढली जाईल. तसेच सोडतीनंतर शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी काढली जाणार आहे. प्रतीक्षा यादी संपल्यानंतरही शाळेमध्ये जागा रिक्त राहिल्यास तसेच अर्ज शिल्लक असल्यास पुढे सोडत सुरू ठेवून विद्यार्थ्यांना शाळा अलॉट केली जाणार आहे.
शाळांची नोंदणी – 8 फेब्रुवारीपर्यंत
प्रवेशअर्ज भरणे –
9 ते 26 फेब्रुवारी
ऑनलाइन सोडत – 5 ते 6 मार्च
प्रवेशनिश्चिती – 9 ते 26 मार्च
प्रतीक्षा यादी टप्पा 1 – 27 मार्च ते 6 एप्रिल
टप्पा 2 – 12 ते 19 एप्रिल
टप्पा 3 – 26 एप्रिल ते 3 मे
टप्पा 4 – 10 ते 15 मे
त्या संस्थांवर कारवाई
काही एनजीओ पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास मदत करीत असल्याचे समोर आले आहे. या संस्था पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी शाळेजवळच्या निवासाचा पत्ता अर्जात भरतात किंवा जाणीवपूर्वक चुकीचा पत्ता टाकतात, अशा संस्थाबाबत तक्रार आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.