महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ जानेवारी – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांची 23 जानेवारी आज जयंती आहे. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दुंगा’ असं आवाहन करत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे प्रेरणादायी विचार आजही तरुणांना स्फूर्ती देतात आणि लोकांना प्रेरणा देतात.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांविरोधात लढण्यासाठी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानच्या सहकार्याने ‘आझाद हिंद सेना’ स्थापन केली. त्यांनी ‘जय हिंद’चा नारा दिला होता. आजही त्यांचे विचार तरुणांना प्रेरणा देतात.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असे सांगितले होते की, ‘त्याग आणि परिश्रमाने मिळालेल्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे.’ नेताजींचे असे म्हणणे होते की, ‘मला हे माहिती नाही की स्वातंत्र्यांच्या या लढाईमध्ये आपल्यापैकी कोण-कोण जिवंत राहील. पण मला हे माहिती आहे की, शेवटी विजय आपलाच होईल.’ नेताजींना विश्वास होता की, भारतामध्ये राष्ट्रवादाने एक अशा सर्जनशील शक्तीचा संचार केला आहे, जो शतकानुशतके लोकांमध्ये सुप्त स्वरूपात वसत होता.’नेताजी असे म्हणाले होते की, ‘आपल्या देशातील प्रमुख समस्या गरिबी, निरक्षरता, रोगराई, कार्यक्षम उत्पादन आणि वितरण या फक्त समाजवादी पद्धतीने सोडवता येतील, याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाही.’‘तडजोड ही अतिशय अपवित्र गोष्ट आहे.’
नेताजींचे विचार ;
* जर तुम्हाच्यावर तात्पुरतं शत्रूपुढे झुकावं लागलं तरीही वीरांप्रमाणे झुका.
* आपल्या मनात फक्त एक इच्छा असायला हवी ती, म्हणजे देशासाठी मरण्याची, जेणेकरुन देश जगू शकेल.
* श्रध्देचा अभाव हे सर्व दु:खांचं मूळ आहे.
* आपण स्वातंत्र्यासाठी रक्ताचं मोल दिलं पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य आहे.