महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – दि. २६ जानेवारी -देशात आता मतदार लवकरच कोणत्याही ठिकाणाहून मतदान करू शकतील. त्यासाठी त्यांना आपल्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघातील पूर्वनिर्धारित मतदान केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही. निवडणूक आयोग या दिशेने तयारी करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सोमवारी ११ व्या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त जारी संदेशात ही माहिती दिली. अरोरा म्हणाले, ‘लवकरच रिमोट व्होटिंग प्रोजेक्टची चाचणी सुरू केली जाईल. आम्ही आयआयटी मद्रास आणि इतर संस्थांसोबत मिळून या प्रकल्पावर काम करत आहोत. परदेशात राहत असलेल्या भारतीय मतदारांना टपाल मतपत्रिकेची सुविधा देण्याच्या आयोगाच्या प्रस्तावावरही कायदा मंत्रालय विचार करत आहे.’
आता ई-मतदार कार्ड डाऊनलोड करता येईल
निवडणूक आयोगाने सोमवारपासून मतदार कार्डाची ई-आवृत्ती उपलब्ध केली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतदार आपले डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करून घेऊ शकतील. दोन टप्प्यांत ही सुविधा सुरू होत आहे. हे कार्ड आधारप्रमाणेच पीडीएफ फॉरमॅटमध्ये असतील.