शेतकरी आंदोलन : हिंसाचारानंतर पंजाब-हरयाणात अर्लट !

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २७ । पुणे । प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असतानाच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मंगळवारी गालबोट लागलं. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतलं आणि बघता बघता संपूर्ण दिल्ली हादरली. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर साहिब ए निशाण ध्वज फडकावला. तर दुसरीकडे पोलीस आणि शेतकरी यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. या हिंसेमुळे दिल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, दिल्लीत मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर पंजाब व हरयाणात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली व हरयाणातील काही भागात मोबाईल सेवाही बंद करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत, असं ठुक्राल यांनी म्हटलं आहे.

हरयाणाचे पोलीस महासंचालक मनोज यादव यांनी सर्व पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर कुणीही अफवा पसरवू नये असं आवाहनही केलं आहे. संवेदनशील भागांमध्ये जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, गुप्तचर यंत्रणाही सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहे, असं यादव यांनी सांगितलं. हरयाणातील सोनीपत झज्जर आणि पववल जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *