महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३०। मुंबई । ‘मेजर’ हा चित्रपट 2 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. ताज हॉटेलमध्ये 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. हा चित्रपट 2 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबू याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. महेश बाबूने चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहिर केली आहे.
या चित्रपटात अदिवी मुख्य भूमिकेत म्हणजेच संदीप उन्नीकृष्णनच्या भूमिकेत झळकणार आहे. एका मुलाखतीत आदिवी त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणाला, ‘संदीप उन्नीकृष्णन यांच्या कथेनं मी खूप प्रभावित झालो. मला आठवतंय की मी त्यांचा एक फोटो पाहिला होता जो सर्व चॅनेल्सवर दाखवला गेला होता. त्यांचा चेहरा पाहून ते मला माझ्या कुटुंबाचा भाग असल्यासारखे वाटले. नंतर मला कळलं की हे मेजर संदीप उन्नीकृष्णन आहेत ज्यांनी देशासाठी प्राण दिलेत.’
हा चित्रपट शशी किरण यांनी दिग्दर्शित केला आहे. अदिवीसह शोभिता धुलीपाला आणि सई मांजरेकर या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.