महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.३। चेन्नई ।हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान शुक्रवारपासून कसोटी क्रिकेट मालिकेला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘टीम इंडिया’ने मंगळवारी सरावाला सुरुवात केली. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रेरणादायी बोलंदाजी करीत हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचे मनोबल उंचावले.‘बीसीसीआय’ने ‘टीम इंडिया’च्या सरावाचे अनेक फोटो ट्विटरवर टाकून ‘चेन्नईतील सराव सत्राचा पहिला दिवस’ अशी फोटो ओळ टाकली. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघातील खेळाडूंचे आधी स्वागत केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणानंतर खेळाडूंनी नेटमधील सरावाला प्रारंभ केला.
सोमवारी उभय संघांची कोरोना टेस्ट झाल्यानंतरच त्यांना सरावाला परवानगी देण्यात आली. इंग्लंड संघाचाही क्वारंटाइन कालावधी सोमवारीच संपला. ‘टीम इंडिया’ने तर क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर सोमवारी सायंकाळीच मैदानावर व्यायाम केला होता. कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हेदेखील हिंदुस्थानी संघात दाखल झाले आहेत. कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱयावरील पहिल्या कसोटीनंतर पितृत्व रजा घेतली होती, तर इशांत दुखापतीमुळे दौऱयाला मुकला होता. याचबरोबर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनही संघात दाखल झाले आहेत.
हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानचे पहिले दोन कसोटी सामने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. पहिली कसोटी 5 ते 9, तर दुसरी कसोटी 13 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या मैदानावर उभय संघांमध्ये आतापर्यंत 9 कसोटी सामने झाले आहेत. यात यजमान संघाने 5, तर पाहुण्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. 1982 मध्ये झालेला कसोटी सामना अनिर्णित सुटला होता.