महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.५। चेन्नई । एम. ए. चिदम्बरम (चेपॉक) स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत फिरकीची जुगलबंदी रंगेल. ऑस्ट्रेलियात संस्मरणीय विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाकडे वर्तमानाचे पाठबळ आहे, तर श्रीलंकेत निर्भेळ यश मिळवणाऱ्या इंग्लंड संघाकडे २०१२च्या ऐतिहासिक विजयाचा भूतकाळ गाठीशी आहे.
करोना साथीमुळे स्थगित झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्व एक वर्षांच्या अंतराने भारतात पुन्हा सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या माघारीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीची स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. पितृत्वाच्या रजेमुळे ऑस्ट्रेलियात तीन कसोटी सामने खेळू न शकलेल्या विराट कोहलीने अजिंक्य रहाणेकडून पुन्हा नेतृत्वाची सूत्रे स्वीकारली आहे. दुसरीकडे, समकालीन क्रिकेटमधील मातब्बर क्रिकेटपटूंमध्ये गणला जाणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट शंभराव्या कसोटी सामन्यात खेळत आहे. २०१२मध्ये अॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने फिरकीच्या बळावर भारतात कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली होती. नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या मालिकेत रूटने फिरकीचे सूत्र आत्मसात करून मालिका जिंकून दाखवली आहे.
भारतीय संघ चेन्नईत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळणार असून, रविचंद्रन अश्विन आणि शहाबाज नदीम यांच्या साथीला वॉशिंग्टन सुंदरआहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात अष्टपैलू चमक दाखवणारा वॉशिंग्टन सुंदर हा रवींद्र जडेजाच्या जागेवर आहे. परंतु अश्विनची ऑफ-स्पिन गोलंदाजी, अशी मांडणी संघ व्यवस्थापनी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८मध्ये पदार्पण करणाऱ्या जसप्रित बुमराचा हा मायदेशातील पहिला कसोटी सामना आहे. बुमराच्या साथीला इशांत शर्मा आहे . दुखापत आणि करोनाच्या विश्रांमुळे वर्षभरानंतर पुनरागमन करीत आहे. गतवर्षी बेसिन रिझव्र्हला खेळलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात इशांतने पाच बळी मिळवले होते.
सलामीवीर रोहित शर्माचा संयम आणि शुभमन गिलचे तंत्र यांचा ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर कस लागला होता. पण मायदेशात ते अधिक आत्मविश्वासाने खेळू शकतील. मयांक अगरवालच्या पुनरागमनाची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील तंत्रात बदल करून चेतेश्वर पुजाराही मोठय़ा खेळी साकारू शकेल. परतलेला कोहली चौथ्या आणि रहाणे पाचव्या स्थानावर खेळतील, तर ऑस्ट्रेलिया गाजवणारा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सहाव्या स्थानावर खेळू शकेल.
सलामीवीर फलंदाज झ्ॉक क्रॉवलेने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घेतली आहे. त्यामुळे रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ले यांच्यावर सलामीची जबाबदारी असेल. डॅनियल लॉरेन्स तिसऱ्या स्थानावर खेळेल, तर रूट, जोस बटलर, बेन स्टोक्स हे महत्त्वाचे खेळाडू अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर उतरतील. अष्टपैलू मोइन सातव्या, बेस आठव्या, लीच नवव्या, आर्चर १०व्या आणि अँडरसन ११व्या स्थानावर खेळण्याची शक्यता आहे.
इंग्लंडसुद्धा फिरकी त्रिकूटाची व्यूहरचना आखण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजीची भिस्त अनुभवी मोईन अलीवर असेल. कारण श्रीलंकेत यशस्वी ठरलेला ऑफ-स्पिनर डॉम बेस आणि डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच यांच्याकडे भारतीय फलंदाजांचा सामना करण्याचा अनुभव नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या जेम्स अँडरसनवर इंग्लंडच्या वेगवान माऱ्याची मदार असेल. उसळणारे चेंडू टाकण्यात जोफ्रा आर्चर पटाईत आहे. बेन स्टोक्स जुन्या चेंडूद्वारे उत्तम रीव्हर्स स्विंग करू शकतो..
१४ एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या ३२ कसोटी सामन्यांपैकी १४ सामने भारताने जिंकले आहेत.
१९-१३ भारतात इंग्लंडचा संघ आतापर्यंत ६० कसोटी सामने खेळला आहे. यापैकी १९ सामने भारताने आणि १३ सामने इंग्लंडने जिंकले आहेत, तर २८ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
५-३ इंग्लंडचा संघ चिदम्बरम स्टेडियमवर नऊ कसोटी सामने खेळला असून, यापैकी पाच सामने भारताने आणि तीन सामने इंग्लंडने जिंकले आहेत. १९८२मधील कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शहाबाज नदीम
इंग्लंड : जो रूट (कर्णधार), डॉमिनिक सिब्ले, रॉरी बर्न्स, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन, , डॉमिनिक बेस, जॅक लीच,
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि एचडी वाहिन्या.