शिवकालीन दारुगोळ्याचा मोठा साठा कोल्हापूरातील पावनगडावर सापडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.५। कोल्हापूर । छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याला जोडुनच पूर्वेकडे लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या पावनगडावर शिवकालीन दारुगोळ्याचा मोठा साठा आज सापडला. चक्क एक-दोन नव्हे तर चारशेहून अधिक तोफगोळे दिशादर्शक फलक लावण्यासाठी खड्डा खोदताना सापडले आहेत. अजूनही तोफगोळे मिळण्याची शक्यता असून एवढ्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे सापडल्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे या घटनेची चर्चा आणि उत्सुकता सर्वत्र लागली आहे.

ऐतिहासिक पन्हाळा किल्ला आणि त्याचा रोमहर्षक इतिहास सर्वज्ञात आहे. याच किल्ल्याला लागून खास पूर्वेकडे नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगड बांधुन घेतला होता. या पावन गडाचे भक्कम तटबंदी, बुरुज तसेच तुपाची विहिर हे वैशिष्ट्य आहे.त्याकाळी जखमी सैनिकांच्या जखमा भरून येण्यासाठी गायीच्या तुपाचा वापर केला जात होता. आजही पावनगडावर तुप साठवून ठेवण्यासाठी असलेली विहीर आहे. आज देखील गड बांधताना बांधलेली दोन सुंदर दगडी मंदिरेही पाहायला मिळतात. जैवविविधता, बिबट्या आणि गवारेड्यांचा येथे वावर आहे.

दरम्यान, येथे वनविभाग आणि टीम पावनगड संस्थेच्यावतीने दिशादर्शक फलक लावण्यात येत असून हे तोफगोळे यासाठी खड्डा काढताना त्यामध्ये सापडले. एवढ्या मोठ्या संख्येने शिवकालीन तोफगोळे सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून शिवभक्तांसह इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याठिकाणी दारू गोळ्याचे कोठारसुद्धा असण्याचा अंदाज इतिहास संशोधकांकडुन व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत पुरातत्त्व खात्याला माहिती दिली असून पंचनामा सुरू आहे. याबाबत पुरातत्व खात्याकडुन रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *