महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० । चेन्नई । विराट कोहलीच्या हिंदुस्थानी संघावर 22 वर्षांनंतर चेन्नईत पराभूत होण्याची नामुष्की ओढवली. जो रूटच्या इंग्लंड संघाने मंगळवारी चेन्नई कसोटीत टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव करीत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱयात यशस्वी होणारी कोहलीची टीम इंग्लिशमध्ये नापास झाली.
न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा पहिला मान मिळविला. आता हिंदुस्थानसह इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे संघ अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीत आहेत. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत 227 धावांनी पराभव झामुळे हिंदुस्थानची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची वाट थोडी बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जर-तरच्या समीकरणावर नजर टाकूया. हिंदुस्थानला अंतिम फेरी गाठण्यासाठी इंग्लंडविरुद्धची मालिका 2-1 किंवा 3-1 फरकाने जिंकावी लागेल. इंग्लंडला अंतिम फेरी गाठण्यासाठी ही मालिका 3-0, 3-1 किंवा 4-0 फरकाने जिंकावी लागेल. याचबरोबर इंग्लंडने ही मालिका 1-0, 2-0, 2-1 ने जिंकल्यास किंवा हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यानची मालिका 1-1 किंवा 2-2 अशी बरोबरीत सुटल्यास ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीत पोहोचेल.
इंग्लंडने 578 धावांचा डोंगर उभारल्यानंतर हिंदुस्थानला 337 धावांवर रोखून पहिल्या डावात 241 धावांची मोठी आघाडी मिळविली. होती. मात्र, हिंदुस्थानने इंग्लंडला दुसऱया डावात 178 धावांत गुंडाळून कसोटीत रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाचव्या दिवसाच्या खेळपट्टीवर विजयासाठी मिळालेल्या 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानी फलंदाजांची त्रेधा उडाली अन् त्यांचा दुसरा डाव 58.1 षटकांत 192 धावांत गारद झाला. वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसन (17/3) व डावखुरा फिरकीपटू जॅक लिच (76/4) यांनी भन्नाट गोलंदाजी केली. इंग्लंडने रुबाबदार विजयासह या द्विपक्षिक कसोटी मालिकेची खणखणीत सुरूवात केली.
चेन्नईत 22 वर्षांनंतर हिंदुस्थानचा कसोटीत पराभव. याआधी, हिंदुस्थानचा 1999मध्ये पाकिस्तानकडून 12 धावांनी पराभव.
हिंदुस्थानचा चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिला पराभव. याआधी, फेब्रुवारी 2017मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पुणे कसोटीत 333 धावांनी पराभव झाला होता.
इंग्लंडने 36 वर्षांनंतर चेन्नईत कसोटी सामना जिंकला. याआधी, जानेवारी 1985 मध्ये इंग्लंडने हिंदुस्थानला हरविले होते.
विराटच्या नेतृत्वाखाली कसोटीत हिंदुस्थानचा सलग चौथा पराभव. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानची चौथ्या स्थानावर घसरण.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव – 578 धावा, हिंदुस्थान पहिला डाव – 337 धावा, इंग्लंड दुसरा डाव – 178 धावा, हिंदुस्थान दुसरा डाव – रोहीत शर्मा त्रि. गो. लिच 12, शुभमन गिल त्रि. गो. ऍण्डरसन 50, चेतेश्वर पुजारा झे. स्टोक्स गो. लिच 15, विराट कोहली त्रि. गो. स्टोक्स 72, अजिंक्य रहाणे त्रि. गो. ऍण्डरसन 0, रिषभ पंत झे. रुट गो. ऍण्डरसन 11, वॉशिंग्टन सुंदर झे. बटलर गो. बेस 0, रवीचंद्रन अश्विन झे. बटलर गो. लिच 9, शाहबाज नदीम झे. बर्न्स गो. लिच 0, इशांत शर्मा नाबाद 0, जसप्रीत बुमराह झे. बटलर गो. आर्चर 4. अवांतर – 14, एकूण – 58.1 षटकांत सर्व बाद 192 धावा. गोलंदाजी – जॅक लिच 26-4-76-4, जेम्स ऍण्डरसन 11-4-17-3, जोफ्रा आर्चर 9.1-4-23-1, डॉम बेस 8-0-50-1, बेन स्टोक्स 4-1-13-1.