पाकच्या तुरुंगात काढली 18 वर्षे, मायदेशी येताच 53 दिवसांत अखेरचा निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० । संभाजीनगर । 65 वर्षीय हसीना यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने निधन, शहरातील जमीन ताब्यात मिळवण्याचे स्वप्न राहिले अधुरेच , अठरा वर्षे पाकिस्तानात कैदेत राहिल्यानंतर अमृतसरमार्गे २७ जानेवारीला शहरात परतलेल्या हसीना दिलशाद अहमद (६५) यांचा मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाकिस्तानात जाण्यापूर्वी शहरात त्यांच्या नावावर असलेली जमीन अज्ञातांनी हडपल्याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केली होती. त्याच्या तीन दिवसांनीच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त हाेत अाहे.

मूळ संभाजीनगर च्या असलेल्या हसीना विवाहानंतर उत्त प्रदेशात स्थायिक झाल्या होत्या. २००२ मध्ये त्या पाकिस्तानातील नातेवाइकांना भेटण्यासाठी रेल्वेने लाहोरला गेल्या. तेथे त्यांची पासपाेर्ट असलेली बॅग हरवली. बरेच दिवस त्या नातेवाइकांचा शोध घेत राहिल्या. मात्र, पाकिस्तान पोलिसांनी त्यांना गुप्तहेर असल्याच्या संशयाखाली १८ वर्षे कैदेत ठेवले. भारत सरकारने त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले. १८ डिसेंबर रोजी अमृतसर व २७ जानेवारी रोजी त्या संभाजीनगरत परतल्या. तेव्हापासून त्या भाच्याकडे राहत होत्या. स्वदेशी परतल्यानंतर ५३ दिवसांनी मंगळवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर फाजलपुरा येथील पीर गैब दर्गा कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. ‘त्या’ जमिनीवर आता दुमजली इमारत

गृह मंत्रालयाने २०१९ मध्ये शहर पोलिसांकडे हसीना यांचे रहिवासी पुरावे गोळा करण्यासाठी सूचना केली होती. त्यानुसार पोलिसांनी काही पुराव्यांसह त्यांची रशीदपुऱ्यात जमीन असल्याची कागदपत्रे जोडली हाेती. तोच पुरावा महत्त्वाचा मानला गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, हसीना शहरात परतल्यानंतर ती जमीनच हडपून त्यावर दोन मजली इमारत बांधल्याचे अाढळले. हसीना यांनी तीन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांकडे तशी तक्रार केली हाेती.

दोन वर्षांपासून पोलिसांनी हसीना यांचे रहिवासी असल्याबाबतचे पुरावे गोळा करून गृह मंत्रालयाला पाठवले होते. त्यात त्यांच्या रशीदपुऱ्यातील जमिनीची कागदपत्रे जोडली हाेती. मात्र, त्याची खातरजमा करताना पोलिसांनी जमीन पाहिली नव्हती का, त्यावर अज्ञातांचा कब्जा असल्याचे लक्षात आले नाही का? हे प्रश्न मात्र अनुत्तरित राहिले. त्याशिवाय त्यांच्या नातेवाइकांनी त्या शहरात येईपर्यंत जमीन पाहिलीच नाही का? हसीना शहरात परतल्यानंतर काही दिवसांनी ती हडपल्याचे कसे समोर आले, या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळू शकली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *