महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -चेन्नई – दि. १६ – टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात (india vs england 2021 2nd test) 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार जो रुटने सर्वाधिक 33 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
अश्विन-अक्षरची फिरकी
या सामन्यात टीम इंडियाच्या फिरकी जोडीने महत्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात फिरकीने 7 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात सर्वच्या सर्व 10 विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या. दुसऱ्या डावात अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर अश्विनने 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. कुलदीप यादवने 1 विकेट मिळवली. तर पहिल्या डावात अश्विनने 5 आणि अक्षरने 2 विकेट्स मिळवल्या.
अक्षर पटेलचं अविस्मरणीय पदार्पण
अक्षर पटेलचं अविस्मरणीय पदार्पण ठरलं. पटेलने पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या. अक्षर पदार्पणात 5 विकेट्स घेणारा 9 वा भारतीय ठरला.
लोकल बॉय अश्विनची अष्टपैलू कामगिरी
अष्टपैलू आर अश्विनने आपल्या घरच्या मैदानावर ऑलराऊंड कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात बॅटिंग करताना केवळ टीम इंडियाचा डावच सावरला नाही तर वैयक्तिक शतकही लगावलं. अश्विनने 134 चेंडूमध्ये हे शतक लगावलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनने एकूण 148 चेंडूत 1 सिक्स आणि 14 चौकारांच्या मदतीने खणखणीत 106 धावा केल्या.
तसेच अश्विनने पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासह अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 29 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात अश्विनने 3 विकेट्स मिळवल्या.
पंतची अफलातून किपींग
विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून धमाकेदार कामगिरी करतोय. अशीच कामगिरी त्याने या दुसऱ्या कसोटीत केली. पंतने या सामन्यात पहिल्या डावात नाबाद 58 धावा केल्या. दुसऱ्या डावात तो अपयशी ठरला. त्याने अवघ्या 8 धावा केल्या. पण त्याने स्टंपमागे शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात किपींग करताना दोन्ही डावात मिळून 2 भन्नाट कॅच आणि 2 स्टपिंग घेतल्या.
टॉस फॅक्टर महत्वाचा
या दुसऱ्या सामन्यात टॉस फॅक्टर महत्वाचा ठरला. टॉस जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय टीम इंडियाने योग्य ठरवत चांगली कामगिरी केली. यामुळे एकूणच भारतीय संघ टॉसचा बॉस ठरल्याने विजयामध्ये टॉसने महत्वाची भूमिका बजावली. याच मैदानात इंग्लंडने पहिल्या कसोटीत टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सामनाही जिंकला होता. यामुळे चेन्नईच्या या एम ए चिदंबरम स्टेडियमवर टॉस फॅक्टर म्हत्वाचा आहे.