महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२०। पुणे । दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक पुणे बोर्डाने जाहीर केले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेत एका वर्गात 25 विद्यार्थीच बसतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनामुळे यंदा सर्वप्रथम लेखी आणि त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांचा एकाच दिवशी पेपर असल्यास एका बेंचवर दोन विद्यार्थी बसू नयेत म्हणून त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्याबाबत लवकरच बोर्ड विद्यार्थ्यांना सूचना देईल.
राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, सातारा, जळगाव, अमरावती, अकोला, नाशिक यासह अन्य काही जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. तत्पूर्वी, 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाची भीती अजूनही पूर्णपणे दूर झालेली नाही. तसेच 25 टक्के अभ्यासक्रम कपात करुनही अद्याप 40 टक्केसुद्धा अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकावर 22 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. परंतु, वेळापत्रकात बदल होईल की नाही हे अद्याप अस्पष्टच आहे. दहावी- बारावीच्या परीक्षा एकाचवेळी होणार असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक शाळांमधील 20, 25, 30 बेंचची संख्या बोर्डाकडून मागविण्यात आली आहे.
दहावी- बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात 25 विद्यार्थी परीक्षा देतील, अशी सोय केली जाईल. दोन्ही वर्गातील मुलांचा पेपर एकाच दिवशी आल्यास एकाच वर्गात विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, अशी व्यवस्था केली जाईल. एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसणार नाहीत.
– दिनकर पाटील,
प्रभारी अध्यक्ष, पुणे बोर्ड, पुणे
महत्वाच्या बाबी…
विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा म्हणून एप्रिल-मेच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
23 एप्रिल ते 21 मे बारावीची तर 29 एप्रिल ते 20 मे दहावीची परीक्षा घेण्याचे नियोजन
सर्वात प्रथम लेखी परीक्षा होणार आणि त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे बोर्डाने केले नियोजन
वेळापत्रकाबाबतच्या सूचना, हरकती 22 फेब्रुवारीपर्यंत विभागीय व राज्य मंडळाकडे लेखी पाठविण्याचे आवाहन
मेअखेर प्रात्यक्षिक परीक्षेला होईल सुरवात; जुलैअखेर निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने सुरू आहे नियोजन