महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२०। पुणे । मुंबईसह राज्यभर करोना रुग्णांची संख्या पुन्हा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत ६,११२ नव्या रुग्णांचे निदान झाले. रुग्णवाढीमुळे कठोर निर्बंध अथवा टाळेबंदी लागू करण्याचे अधिकार राज्य शासनाने स्थानिक प्रशासनांना दिले आहेत.कोणतीही व्यक्तिगत दक्षता न घेता अनेक लोक काही दिवसांपासून करोना महासाथ संपल्याच्या आविर्भावात वावरत आहेत. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या चार दिवसांत करोनाबाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. विवाह सोहळे, राजकीय नेत्यांचे कार्यक्रम, विविध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांमध्ये झालेल्या गर्दीमुळेच संसर्ग वाढल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर आणि अमरावतीमध्ये ६०० पेक्षा अधिक रुग्ण आढळले असून, मुंबई, ठाण्यातही आकडा वाढला आहे.
करोना रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. गुरुवारी १८,३०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी पाच टक्के अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत ३० लाख ९८ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.प्रसंगी कठोर भूमिका राजकीय कार्यक्रम, सभा, विवाह सोहळे यावर कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. गर्दी होणारे समारंभ टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दी हटविण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेण्यास सांगण्यात आले आहे.
चार मंत्री करोनाबाधित ; आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे चार मंत्री सध्या करोनाबाधित झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानी काम करणारे दोघे जण बाधित झाले आहेत. यापैकी कडू यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली. वाढती रुग्णसंख्या आणि चार मंत्री करोनाबाधित झाल्याने पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अधिवेशन तीन-चार दिवस विलंबाने सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
२४ तासांत..
* दिवसभरात मुंबईत ८२३, ठाण्यात १३८, कल्याण-डोंबिवली १४६, नवी मुंबईमध्ये १२६, नागपुरात ६३०, अमरावती शहरात ६२३, अकोल्यात १२७.
* पुण्यामध्ये ५३५, पिंपरी-चिंचवडमध्ये २५९, उर्वरित पुणे जिल्हा २११, नाशिक शहरात १७६, जळगावमध्ये ११०, नगरमध्ये १२८, यवतमाळ २५८ नवे रुग्ण आढळले.
* उपचाराधीन रुग्णसंख्याही ४४,७६५ झाली आहे. मुंबईतील ५ जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून सध्या ६५७७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
मुंबई: अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये परदेशात आढळणाऱ्या विषाणूचा कोणताही प्रकार आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाने शुक्र वारी स्पष्ट के ले. अमरावती, यवतमाळ जिल्ह्य़ातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ब्रिटनमध्ये आढळलेल्या विषाणूचा या भागात प्रादुर्भाव झाल्याच्या चर्चेने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. आरोग्य विभागाने मात्र ही शक्यता फे टाळून लावली.