महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२०। पुणे । पुण्यात वादळी वाऱ्यानंतर आता गारठा वाढेल असा इशारा हवामान खात्याने दिला. शहरात १६ पर्यंत वाढलेला किमान तापमानाचा पारा पुढील चार ते पाच दिवसांमध्ये १३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाजही वर्तविला.शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, त्यामुळे हवेतील गारठा वाढत आहे. शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा १६.३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला गेला.
आज शनिवारी (ता. २०) आकाश ढगाळ राहणार असले तरीही त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. त्यामुळे हवेतील गारठा वाढण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली.