महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१। मुंबई । कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील या शहरांत अॅलर्ट देण्यात आलेला आहे. तेथे नव्याने काही निर्बंध लागू करण्याबरोबरच कोरोनाच्या सध्याच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही याचीही प्रशासनाकडून पहाणी केली जात आहे. नियमभंग करणार्यांकडून दंडही वसूल केला जात आहे.
पुणे – पुणे महापालिकेकडून कडक पावले उचलत शहरात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबतची नियमावली जाहीर केली आहे.
नाशिक – जिल्ह्यात लग्नसोहळ्यांवर पुन्हा निर्बंध घातले आहेत. लग्नाला फक्त 100 लोकच उपस्थित राहू शकतील.
मुंबई – कोरोना महामारीने दुसर्यांदा महाराष्ट्राला घेरले आहे. विषाणूचा संसर्ग वाढल्याने राज्य सरकारने सतर्कतेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदीपर्यंतच्या अनेक बाबींची दक्षता घेतली जात आहे.
वसई-विरार – येथील महापालिकेने मास्क न घालणार्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या नागरिकांना 200 रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. दुकाने, कार्यालयांत नियमांचे पालन न केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. सतत नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने बंद करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
ठाणे – सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, लग्न समारंभ, क्लब आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न करणार्यांवर प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बाजारपेठा, रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकांवर चाचणी केंद्रे सुरू केली जातील. गरज भासल्यास खासगी रुग्णालये कोविड केअर सेंटर्स म्हणून अधिगृहित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली – शहरातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केडीएमसी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी नियमावली जारी केली आहेत. सोशल डिस्टंसिंग न पाळणार्या व विनामास्क फिरणार्यांवर कारवाई केली जात आहे.
कोल्हापूर – सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर सक्तीचा केला आहे. जर नागरिकांनी नियमांचे पालन नाही केले तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. लग्नसमारंभ व मेळावे बंदिस्त जागेत तसेच 50 टक्के उपस्थितीत होतील. अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार आहे.
नागपूर – नागपुरात 19 फेब्रुवारी रोजी 644 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवस आधी परवानगी बंधनकारक केली आहे. एका इमारतीत पाच रुग्ण आढळले तर इमारत सील करण्याचे आणि फ्लॅट सील करण्याचे आदेश दिले आहेत.
यवतमाळ – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रस्त्यावर उतरुन पाहणी केली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर देत रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन केले आहे.
औरंगाबाद – महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी शहरातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश दिला आहे. या नव्या आदेशानुसार 10 आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग बंद असणार आहेत. होम क्वॉरंटाईनवर भर देण्यात आला आहे.
पंढरपूर – परिसरातील दहा गावांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारीच्या पंढरपुरातील माघी यात्रेत दिंड्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अकोला – रात्रीचा कर्फ्यू जारी लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता कहर पाहता जिल्हाधिर्यांनी हा आदेश जारी केला आहे. रात्री 8 पासून ते सकाळी 6 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. जिल्ह्यात एकूण 13593 बाधित आहेत. सध्या जिल्ह्यात 1822 रुग्ण उपचार घेत आहेत.